एवढा मी धावलो की, चालणेही शक्य नाही!
बेगडी शहरात ह्या मज थांबणेही शक्य नाही!!
चेहऱ्याने आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज जखमांना परंतू झाकणेही शक्य नाही!
एकटे गाठून मजला घेरले साऱ्या स्मृतींनी....
या पिशाच्चांना तसे समजावणेही शक्य नाही!
जे तिन्हीत्रीकाळ असती वेदनांनी वेढलेले;
हुंदके गझलेत त्यांना टाळणेही शक्य नाही!
माणसे नाहीत सारे वर्तुळांचे केन्द्रबिन्दू!
वर्तुळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!
कोणतीही वाट नसते फक्त काट्यांची परंतू;
टाळुनी काटे, फुलांना वेचणेही शक्य नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१