कैफ माझ्या काळजाचा ह्या तुझ्या दारूत नाही!

कैफ माझ्या काळजाचा ह्या तुझ्या दारूत नाही!
मी पिण्याआधीच माझ्या राहिलो काबूत नाही!!

हे अताशा आगलावे सांत्वनासाठी निघाले....
आज जेव्हा एकही घर राहिले शाबूत नाही!

रंगवेडा, गंधवेडा, एक मी सौंदर्यवेडा!
मी कुणाचा भाट नाही, मी कुणाचा दूत नाही!!

जन्म गेला पावलांचा वाळवंटी चालताना....
जाळण्याइतका मला चटका तुझ्या वाळूत नाही!

माझिया थडग्यावरी साकारले ते राजवाडे!
मी तिथे राहूनही त्यांच्यात अंतर्भूत नाही!!

बेरजा किंवा वजाबाक्या तुम्ही तुमच्याच मांडा......
हे असे खेळायला आयुष्य म्हणजे द्यूत नाही!

मी हवा काढून त्यांच्या घेतली साऱ्या कटाची!
वार करण्याएवढी ताकद कुण्या बाहूत नाही!!

द्यायचे नव्हते  मला प्रेतासही माझ्या विटाळू!
ह्याचसाठी मी कुणा उचलू दिला ताबूत नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१