अजून रेंगाळतो कुणाचा सुवास येथे!

अजून रेंगाळतो कुणाचा सुवास येथे!
पुन्हा पुन्हा की, मलाच होतात भास येथे!!

तसेच डोळे अजून ओले कसे फुलांचे?
अखेरचा घेतला कुणी काल श्वास येथे!

मधेच दाटून मेघ येती तुझ्या स्मृतींचे....
मधेच घोंगावतात वारे उदास येथे!

हरेक वेळेस देव धावून येत नाही;
नकोस ऐशी करू कधीही मिजास येथे!

लुटून सारा सुगंध ते जाहले फरारी....
कुणीच उरले न सोबतीला फुलास येथे!

कधीच ती काळजात माझ्या हळूच शिरली;
अजून सजवीत बैसलो मी घरास येथे!

घरून तिज यायला जरासा उशीर झाला....
करीत मी काय काय बसलो कयास येथे!

अम्हास आले न ओळखाया कधीच मोती!
उगाच मोती म्हणून टिपले दवास येथे!!

खुशाल त्यांना तिथे लिहू दे निकाल माझा!
मला करू दे अजून थोडा प्रयास येथे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१