जहर जगण्याचे भिनाया लागले!

गझल
जहर जगण्याचे भिनाया लागले!
ओठ माझे गुणगुणाया लागले!!

जाहली खात्री वसंताची मला;
आज काटे दरवळाया लागले!

जाहले जागे जसे ज्वालामुखी....
वेगळे वारे वहाया लागले!

पार तू गेल्यावरी आता मला;
काय बोलावे....सुचाया लागले!

आरशांनी दाविल्या मज सुरकुत्या!
रक्त माझे सळसळाया लागले!!

सोसले भूकंप हृदयातील मी;
मन मला माझे कळाया लागले!

सद्गुरूंनी वाट दाखवली मला!
आणि जगणे झुळझुळाया लागले!

सर वळीवाची सुखाच्या संपली.....
ऊन्ह दु:खांचे पडाया लागले!

धूमकेतू प्रश्नचिन्हांचे पुन्हा;
अंतरंगी भिरभिराया लागले!

संयमाचा बांध एकांतामधे.....
भंगुनी डोळे झराया लागले!

राख कोणाची अशी होवू नये!
स्वप्न माझे सावडाया लागले!!

जाहला मधुमेह का माझा बरा?
घाव माझेही भराया लागले!

यात अंतरजाल हे दोषी कसे?
लोक त्यांचे ते चळाया लागले!

काय, मी चंबूगबाळे आवरू?
मुश्किलीने मन रुळाया लागले!

मी गझल छापावयाला लागलो....
अन् समीक्षक का पळाया लागले!

ना उपद्रव कोणताही, पाहुनी....
लोक मजला वापराया लागले!

............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१