प्रवास डायरी..

जाने.३..

या वर्षी हा नवीन प्रयोग करून बघू या.. भटक्या पाखरासारखं सतत भटकत असतोच , तर त्याबद्दल लिहू या ना..जरा मज्जा!!

आज पुण्याला निघालोय. आक्का, याया, सुधा आणि मी.. यांचा आतेभाऊ राज भिडे यांच्या मुलाचे लग्न आहे.आक्का- याया १५ दिवस इथेच होते. वर्षभरापासून ठरलं होतं, नाशिकच्या घरात गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हणून...सुरू करताना गंमतच झाली.पहिल्या अध्यायाच्या वाचनातच यायांना दम लागू लागला, आवाज निघेना. मग मला हात केला, वाच म्हणून..पूर्वी त्यांना मान्य नव्हतं बायकांनी गुरुचरित्र वाचणं, पण वेळच अशी आली  की सगळे वाद बाजूला पडून मला वाचायला सांगितलं..मलाही उत्सुकता होतीच. असं अचानक अंगावर पडल्यावर ..पडत्या फळाची आज्ञा.. केलं पूर्ण. आई होतीच रहायला आलेली.. तिनेही खूपदा वाचलंय, म्हणाली..मग पारण्याला शिरीष- अनघा होते मेहुण म्हणून.. मग २-३ दिवस आराम केला. आता पुणे..चैतन्यचं लग्न जर रजिस्टरच करायचं होतं, तर उगीचच २ दिवस टिफीन खात बसलो ..पण ठीक आहे, तिथे निर्वाण- निर्मोही, हेमंत-मनीषा होते, त्यांचा सहवास तर मिळाला.आवश्यक विधींना संपूर्ण चाट.. मात्र हल्दी,मेहंदी,संगीत,नृत्य अशा चिकटवलेल्या सोहोळ्यांनी लग्न साजरं झालं..दुसऱ्या दिवशी सत्यनारायण झाल्यावर जेवून परत निघालो..