काळजाचे पान कुठले फडफडाया लागले?

गझल
काळजाचे पान कुठले फडफडाया लागले?
हे पुन्हा पाऊल माझे अडखळाया लागले!

हा तुझा आभास नुसता, की, तुझी चाहूल ही.....
पाखरू माझ्या मनाचे भिरभिराया लागले!

स्वाभिमानी खूप होते, काय त्यांचे जाहले?
ते पहा....जाते जिण्याचे घरघराया लागले!

याच गाण्याने अम्हाला एकदा फाशी दिली...
तेच गाणे लोक आता गुणगुणाया लागले!
 
साधले त्याने अखेरी, त्यास जे साधायचे;
हे अताशा रक्त माझे सळसळाया लागले!

तू दिली मज दिव्य दृष्टी आणि सृष्टी बदलली....
जागजागी दिव्य देखावे दिसाया लागले!

कंदिलांनो! दु:ख हे तुमच्याच वाट्याला नव्हे;
सूर्य सुद्धा कैक आता काजळाया लागले!

वाढत्या जेव्हा वयाचे पावसाळे पाहिले.....
कोण परके, आपले ते मज कळाया लागले!

तू कुठे आहेस ते आजन्म नाही समजले;
प्राण जातानाच उत्तर सापडाया लागले!

आमच्या  गझलेत आहे काय कटुता एवढी?
वाचण्या आधीच त्यांना मळमळाया लागले!

गाउनी मी पेश केला एक मतला काय तो;
तोच काहींच्या घशाला खवखवाया लागले!

गंध उतरू लागला गझलेत माझ्या, तो तुझा;
दूर माझ्यापासुनी शायर पळाया लागले!

चूडही लावायची, पडली चितेला ना गरज!
प्रेतवत माझे जिणे आधी जळाया लागले!!
 
काय थोडीफार पुण्याई कमवली जीवनी....
आज वार्धक्यात त्याचे फळ मिळाया लागले!

पैलतीराने कधीचे धाडले बोलावणे!
जीवना! चलतो अता! मन तळमळाया लागले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१