गझल
काळीज सोलणारा सारा प्रसंग होता!
बेरंग माणसांचा तो एक रंग होता!!
पाहून लोक गेले, ना पाहिल्याप्रमाणे......
मदतीस एक माझ्या आला अपंग होता!
नाही कधीच केली, कुरबूर पावलांनी;
रस्ता जरी कितीही अमुचा भणंग होता!
हा रोमरोम झाला बघण्यास त्यास डोळा;
साक्षात वाटले की, तो पांडुरंग होता!
नाही ढळू दिली मी शांती कधी मनाची!
आला तसाच गेला, क्षण जो तरंग होता!!
त्याच्यामुळेच झाली ओळख खऱ्या नभाची;
गगनास बिलगणारा तोही विहंग होता!
शेरांवरीच माझ्या पडले तुटून सारे!
एकेक शेर माझा म्हणजे तवंग होता!!
ते सूर बासरीचे, की, नादब्रह्म होते?
श्रोता हरेक अगदी त्याच्यात दंग होता!
रुद्रावतार त्याचा, फूत्कार काय त्याचा!
पोशाख माणसाचा, पण तो भुजंग होता!!
ना लागला कुणाच्या हातास तो कधीही....
गगनात उंच इतक्या कटला पतंग होता!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१