सिद्धोबा

मुख्य रस्त्यावर तो कधीच
नसतो.
थोडं आत वळल्यावर -
भर
दुपारी अचानक
एक हिरवाकंच
पाचू सामोरा येतो.
मूळ खोड
नसणाऱ्या
पारंब्यांच्या
वडाखाली
मोरांचा एक थवा
केकारवत फिरतो इकडेतिकडे.
तहानलेल्या डोंगराच्या
पायथ्याशी
एक नितळ झरा आहे,
थंडगार!
वेळू आणि आमराई
वगैरेही- 

निळंशार आकाश,
स्वच्छ मन,
निवलेले डोळे,
अक्षय शांती-
तोच सिद्धोबा!

पण थोडं आत
वळावं लागतं -
स्वतःच्या.
कारण मुख्य रस्त्यावर तो
कधीच नसतो -
तिथे रहदारी
असते फक्त.