बडीशोप - पूर्वार्ध

"ताई, तुम्ही बोलावलंत असा निरोप सांगितला आईने. " असे म्हणत मी मंजूच्या घरात जायला लागले अन् लक्षात आलं की ती जेवायला बसली आहे.

"अरे हां.. नए मोतीके गहने लायी मैं.. वो दिखाने थे तुम्हे.. ५ मिनिटमे खाना हो जाएगा मेरा.. चलेगा ना? "
"होऊ दे तुझं जेवण आरामशीर.. काही हरकत नाही."
"तुमभी लोगी थोडी भिंडीकी सब्जी और रोटी?"
"नाही गं.. मी हे आत्ताच जेवण करून आले"
"थोडास्सा खाओ ना.."
"माझ्या तोंडात बडीशोप आहे गं.. तुझं होऊ दे आरामशीर.."
"सौंफ??!!! दीदी मुझेभी चाहिए है सौंफ.. " मंजूची ५ वर्षाची मुलगी किर्ती.. माझी दोस्त! आईबाबांना दादा-दादी म्हणते आणि मला दीदी! कोणी विचारले कोणाकडे गेली होतीस की सांगते, "दादीके दीदीके पास"! 
"अरे बापरे! अब ये तुम्हे छोडेगी नहीं.. " मंजू
मंजूचे बोलणे ऐकू येणार नाही इतक्या तारसप्तकात किर्ती सांगत होती, "है ना दीदी, मैने खाना खा लिया है. दो रोटी और सब्जी. अब मुझेभी सौंफ दो.. " किर्तीला माहितेय मी तिला बडीशोप असो किंवा आमसुलाची गोळी.. जेवण झाल्याशिवाय काही देत नाही ते म्हणून ही माहिती.
मागे कॉलनीतल्या सगळ्यांच्या घरी थोडीथोडी बडीशोप खातखात पोट बिघडवून घेतले होते त्यामुळे मंजूने बडीशोपवर अगदी कडक निर्बंध लागू केले होते तिच्या. मी बोलताबोलता बडीशोपेचा उल्लेख करून भारीच मोठी चूक करून बसले होते.. आता निस्तरायला तर हवेच होते..मंजूकडे बघत डोळे मिटून घेऊन तिला "मी बघते" असे खुणावले. 
"तू आधी तुझा होमवर्क केलास का ते दाखव मग त्यात चूक नसशील केलीस तरच तुला बडीशोप द्यायचा विचार करेन मी. " 
"लेकीन दीदी होमवर्क तो अभी बाकी है.. "
"मग? आता बडीशोप नाही.. "
"रुको.. रुको.. मैं खतम कर देती ना अभी के अभी.. फिर तो दोगी ना सौंफ.. "
"पहले करो फिर देखेंगे.. "
इतके होईतो मंजूचे जेवण झाले होते तर तिने तिचे मोत्यांचे सेट दाखवायला सुरूवात केली पण किर्तीला कुठे चैन पडायला? बडीशोपेचा खजिना माझ्या घरी असल्याने ती मला तिच्या घरातून खदडून माझ्या घरी घेऊन यायला आतुर होती. थोडं मंजूचं, थोडं किट्टूचं असं करतकरत किट्टूच्या पुढेपुढे पळण्याला आवरत तिच्यामागे माझ्या घरी आले.
घरी आल्याआल्या "दीदी, सौंफ किधर रखी है? "
"पहिले तू सांग.. होमवर्क कुठे लिहिलायस? "
"अरे वो मैं फटाफट कर लुंगी ना बाद मे.. मुझे तीन दिन छुट्टी है ना अभी.. बस्स सॅटरडेको स्कूल जाना है फ्लॅग होस्टींगके लिए.. उसमे ना मैं ऐसे दोनो हाथ पिछे करके खडी रहनेवाली हूं दो-दो की जोडीमे और पिछेसे कोई तो भागनेवाला है.. " तिची टकळी चालूच..
"किट्टू.. होमवर्क.. "
"हां... ये देखो ये January, February March April लिखना है दस-दस बार और फिर थ्री का और फोरका टेबल लिखना है.. "
"ठीक है.. फिर चलो चालू करो फटाफट.. "
"आप पहले लाईन तो खिंचके दो ना.. "
हे काय आता नविन? असं मी विचार करत होते तोवर तिने जाऊन तिच्या दादूंच्या ड्रॉवरमधनं फुटपट्टी काढून मला आणून दिली.तिच्या वहीच्या आदल्या पानांवर मारलेल्या रेषा पाहून मी माझ्या हस्ताक्षरात जानेवारी लिहून मग त्याच्याशेजारी थोडी जागा ठेवून दहा ओळींपर्यंतची एक रेष मारून दिली. "जानेवारी लिहून संपव मग मी तुला पुढचं सांगते.. "
तिने कर्सिव्हमध्ये जानेवारी लिहायला सुरूवात केली आणि तिचे जानेवारी त्या रेषेच्या बाहेर जायला लागावे इतके मोठे होते. 
"दीदी आपने कितनी कम जगह रखी है। इतनीसी जगहमे जानेवारी कैसे बैठेगा? " असे म्हणून तिने माझी रेष खोडरबरने पुसून टाकली आणि तिचे ऐसपैस जानेवारी पूर्ण केले आणि मी त्यापुढे रेष मारून दिली. असे करत करत त्या चार महिन्यांचे ४० शब्द काय ते लिहितो, अख्खे जग उलथेपालथे केल्यागत आमची चर्चा चालली होती!
"आता टेबल्स लिहायचेत ना?"
"वो मुझे आता है.. थ्री वन्झा थ्री, थ्री टूझा सीक्स, थ्री थ्रीझा नाईन.. " गाडी सुरळीत सुरू आहे पाहून मी हुश्श करणार तोवर..
"थ्री फोर्झा एट.. "
"काय? "
"थ्री फोर्झा एट ही होता है.. हमारी मिसने बताया है। दीदी है ना.. सुबह दादीने मुझे बडासा शूफ्लावर दिया था जो मैने मिसको दिया बालोमे लगाने के लिए.. " थ्री फोर्झा एटवरून गाडी शूफ्लावरात कशी काय घुसली मला काही कळले नाही.. माझ्या इंग्लिशच्या अगाध ज्ञानाने आधी शूफ्लावर म्हणजे जास्वंद हे कळायलाच मला अवधी लागला! 
"किट्टू, इकडे तिकडे करणं बंद कर बरं तू आधी.. आधी सांग.. थ्री फोर्झा किती? "
"थ्री वन्झा थ्री , थ्री टूझा सीक्स, थ्री थ्रीझा नाईन, थ्री फोर्झा... एट? " माझ्याकडे तिची पाहणारी प्रश्नार्थक मुद्रा!
"उंहूं.. "
"फिर? "
"तूच सांग किती ते.. "
"कितने छोडने? दो? की तीन? "
"म्हणजे? "
"अरे... कितने छोडने बताओ ना.. " काही म्हणता काही शेंडाबुडखा कळत नव्हता तिच्या बोलण्याचा पण थोडे डोके लावल्यावर कळले की मंजूने बहुतेक तीनच्या पाढ्यात आधीच्या आकड्यापुढचे दोन आकडे सोडून पुढचा आकडा पुढे लिहायचा असे सांगितले असावे. म्हणजे तीन दुने सहा झाले की पुढचे ७ आणि ८ सोडून पुढचे तीन त्रिक ९ लिहायचे असे.. युक्ती जरी योग्य असली तरी पाढे पाठ करायच्या वेळी त्याला बगल द्यायला ही युक्ती वापरलेली मला बरोबर वाटली नाही.
"कितने छोडने वो छोडो.. और ये टेबल लिखना भी छोडो.. आपण आधी थ्रीचे टेबल नुसते म्हणुया.. चालेल? "
"कितने छोडने वो बताओ ना.. मैं फटाफट लिख लेती फिर मुझे सौंफ देना और फिर मैं टेबल बोलके बताती हूं ना.. " किट्टूची घासाघीस!
क्रमशः