मुक्या वेदनांचा मुका मार होता!

गझल
मुक्या वेदनांचा मुका मार होता!
कृपेचा तुझ्या फक्त आधार होता!!

मला ठाम ठाऊक होते, जगा हे.....
तुझा आळ जात्या निराधार होता!

तरीही उभारी किती मी धरावी?
मनावर व्यथांचा किती भार होता!

फळे जी कडू, गोड वाट्यास आली....
कृतींचाच माझ्या गुणाकार होता!

पशू हिंस्रही सर्व शरमून गेले....
असा माणसांचा दुराचार होता!

जिथे बारमाही अहोरात्र दारू!
घराच्या जवळ नेमका बार होता!!

विडी, पान, दारू, उभा जन्म चालू!
तरीही जिता तो....चमत्कार होता!!

नव्हे गाठ पडणार, पडलीच पण ती....
किती तो दिखाऊ नमस्कार होता!

फुलांनी कशा टाकल्या आज माना?
कुणाचा इथे आज सत्कार होता?

सुळाने तयाला नमस्कार केला!
किती धन्य तो वीर झुंझार होता!!

फुले द्यायचे, घ्यायचे लोक तेथे...
फुलांचा तिथे चोरबाजार होता!

दिसाया दरिद्री जरी आज आहे!
अरे! कालचा तो वतनदार होता!!

मनस्वीच जगला! मनस्वीच मेला!
अरे, शेवटी तो कलाकार होता!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१