उधळीत फक्त गेलो मी गंध भोवताली!

गझल
उधळीत फक्त गेलो मी गंध भोवताली!
मजला कधी जगाच्या कळल्या न हालचाली!

आहेस तूच पहिला वहिला विचारणारा;
रानातल्या फुलाला त्याची अशी खुशाली!

बोलायला हवे ते मी नेमके विसरलो!
अगदी उभ्या उभ्या ती स्वप्नात काल आली!!

अमुचा तसा न काही संवाद फार झाला;
चोरून भेटण्याची चर्चाच फार झाली!

पाऊस श्रावणाचा यावा तशी अचानक;
रुसते कधी कधी ती, हसते मधेच गाली!

आयोग तो सहावा, जाहीर काय झाला!
प्रत्येक चेहऱ्यावर चढली अपूर्व लाली!!

ती जन्मखूण होती, बघताच प्रेम जडले....
तो तीळ हनुवटीचा! कातिल खळीच गाली!

बघ ऊठसूठ लिहितो, जो तो हवे नको ते!
गझलेस काय उरला नाही कुणीच वाली?

डोळे मिटून सारी पापे करून झाली!
देवास पूजण्याची घाई कितीक झाली!!

देती सहज सुपारी, घडतात रोज हत्त्या!
माणूस स्वस्त झाला, माया महाग झाली!!

व्यक्ती असो कुणीही, निवृत्त व्हायची ती!
यादीत नाव माझे वर काय, काय खाली!!

ते  थोर लोक, ज्यांची उठलीत पावले ही.....
होतील मार्गदर्शक, त्यांच्याच वाटचाली!

करतो प्रयास माझा, परवा करीत नाही!
विधिलेख कोणता या लिहिला असेल भाली?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१