कागदी होती फुले अन् बेगडी सन्मान होते!

गझल
कागदी होती फुले अन् बेगडी सन्मान होते!
हे समजण्या एवढे मजला कुठे व्यवधान होते?

गरजणाऱ्या त्या विजांनाही अता माहीत झाले....
की, पुन्हा उमलून फुलण्याचे मला वरदान होते!

मी न गेलो सिद्ध करण्यास्तव कधी अस्तित्व माझे;
हे चराचर जाणते की, काय माझे स्थान होते!

मी तुला भासू दिले नाही कधी नजरेत माझ्या;
वेदनांचे माझिया हृदयामधे थैमान होते!

वाटले त्यांना जणू आकाश झाले मालकीचे!
खुद्द चंद्राशी जणू त्यांचे म्हणे संधान होते!!

वेंधळा मी, चालण्यामध्येच इतका गर्क झालो;
गाव माझे येवुनी गेले, कुठे मज भान होते?

उंदराला मांजराने साक्ष द्यावी त्याप्रमाणे.....
एक म्हटला छान की, सगळेच म्हणती छान होते!

जो मला भेटेल त्याला वाटले काळीज माझे....
मी कसे मागू परत, ते मी दिलेले दान होते!

कावळ्याने काय एका सूर धरला, तोच साऱ्या...
कावळ्यांना वाटले ते कोकिळेचे गान होते!

मानसन्मानांमधे झिंगायचा हा पिंड नाही!
माझियासाठी कशाचे मान अन् अपमान होते!!

हाक केव्हाही मला तू द्यायची होतीस मृत्यो!
मी सडा होतो, कुठे माझे असे सामान होते?

पाहिले मी ते मणी एकाच माळेतील होते!
मी कसा लागेन नादी? लोक ते नादान होते!!

डाव हातातून निसटत चालला होता जिण्याचा....
मी तरी माझ्यात उसने आणले अवसान होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१