जाळुनी काळीज केली रोषणाई!

गझल
जाळुनी काळीज केली रोषणाई!
तू दिव्या, आता नको मारू बढाई!!

मस्त तू कैफात जगण्याच्या परंतू;
भोवती वेड्या तुझ्या सारे कसाई!

ओठ थरथरते तुझे मी पाहिले अन्;
माझिया ओठांवरी आली रुबाई!

आज कळते की, किनारा दूर नव्हता!
मीच तेव्हा दाविली नाही धिटाई!!

तू मला हेटाळले कित्येकदा पण....
जीवना! केली तुझीही सरबराई!

अक्षरे ही कोरडी नाहीत नुसती....
ओतली मी त्यांत आत्म्याचीच शाई!

स्वप्न तू मजला वसंताचे दिले पण....
हाय! या ग्रीष्मात माझा जीव जाई!

ये मला अन् मार बैला! हेच होते....
तू नको जाऊ करायाला भलाई!

पेरतो साखर अरे, तो बोलताना!
पाठ फिरली की, सुरू करतो बुराई!!

वाढ दोघांची असे अद्याप चालू....
तू हिमालय! बेट मी आहे हवाई!

मायबोलीचे तळे होवू नये रे...
का झऱ्यांना झुळझुळायाला मनाई?

ये जरा, तू थांब, बोलू या मनस्वी....
पाहतो तेव्हा तुझी असतेच घाई!

जो जसा आहे तसे संबोधतो मज....
कोण ताई, कोण माई, कोण बाई!

काळ वेड्या बदलतो, नाती बदलती!
कोण होतो सासरा कोणी जमाई!!

आज विद्यार्थी हजारो नाव घेती....
हीच पुण्याई खरी माझी कमाई!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१