संपलेल्या मैफिलीचा सूर होतो!

गझल
संपलेल्या मैफिलीचा सूर होतो!
मी तिच्या हृदयातली हुरहूर होतो!!

तू कुठे जाशील मज शोधावयाला?
मी तुझ्या तबकातला कापूर होतो!

वर्ख त्या वस्तीस होते शांततेचे.....
मात्र मी गर्भातले काहूर होतो!

काळ येणारा उद्या ठरवील सारे....
मी जरी तुम्हास नामंजूर होतो!

लागलो होतो जरी मी ओसराया;
पण, तुझ्या प्राणातला मी पूर होतो!

फाडतो जेव्हा मुखवटे या जगाचे;
या जगाचा चेहरा भेसूर होतो!

पत्र मी, ज्याच्यावरी पत्ता चुकीचा;
पोचण्यासाठी किती आतूर होतो!

दे हवा आता चितेला, पेटली ती....
या मढ्यांना त्रास होतो, धूर होतो!

आज हातांच्या घड्या, चुपचाप तोंडे;
बोलण्याने वादही भरपूर होतो!

मी तुझ्या श्वासांत अंतर्भूत होतो!
मी तुझ्यापासून कोठे दूर होतो!

ठेवले हृदयी तिने, डोळ्यांत नाही!
बंद पत्रातील मी मजकूर होतो!!

    स्पंदनांची समजते मजलाच बोली!
मी धडकणाऱ्या जिवांचे ऊर होतो!!

लागली स्पर्धाच बोली लावताना....
मी लिलावी त्या असा मगदूर होतो!

येवुनी संधी कधी गेली कळेना........
मी जिच्या स्वप्नात अगदी चूर होतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१