लाल पेरू

"अरे,
मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ. " असे म्हणत मित्राने मला जवळ
जवळ ओढतच दुकानात नेले.  मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने
मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता.
त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार
नाही म्हणून दुःख हि झाले होते. त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका
सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर
गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो.

पेरू,

अहाहा.. या दोन शब्दातच किती सुख सामावले आहे. तुम्हाला ते जाणवणार नाही
पण नुसते त्या दोन शब्दांच्या उच्चारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटते.
"मोठेपणी तू कोण होणार बाळा? " अश्या बाळबोध प्रश्नांना मी 'डॉक्टर,
इंजिनिअर अशी टिपीकल उत्तरे न देत "पेरूवाला" होणार असे उत्तर देऊन सर्वांना
चकित करायचो. ( आई वडिलांना लाज आणायचो असेही म्हणता येईल). पण खरंच,
लहानपणापासून माझे स्वप्न होते ते पेरूवाला बनण्याचे. "किती मनसोक्त पेरू
खायला मिळत असतील न या पेरूवाल्या काकांना? आणि त्यामुळेच हे एवढे चांगले
असावेत का? पेरूवाल्या काकांचे गाव कोणते असावे?   नंतर भूगोल शिकल्यानंतर,  
अमेरिकेमधील "पेरू" हे शहर त्यांच्यामुळेच उदयास आले असावे का? ' असे
असंख्य प्रश्न मला पडत असत.


रुपयांना मिळणारे पेरू हे जसे अमृताचा गोळा वाटायचे तसे, त्याचे ४ काप करून
त्यात तिखट मीठ घालून हिरवागार पेरू देणारे काका हेच मला ईश्वराचे रूप
भासायचे.

हिरवेगार तर कधी लाल पेरू खायची इच्छा झाली की
मग आम्ही गावात घराच्या मागील पेरूच्या बागेत धूम ठोकायचो. मनसोक्त पेरू
खाऊन  झाले की मग त्यातल्या बिया दाताने कडकड चावून कोणाचे दात जास्त
चांगले
याची स्पर्धा लागायची.  गावातील जत्रेमध्ये व बाजारामध्ये पेरूवाले दिसले
की
प्रत्येकाला भाव विचारायचा आणि घ्यायचा मात्र  एखादाच. पण तो हि घ्यायला
पराकोटीची हुज्जत, जिकीर.

एकदा
एका झाडाला मोठा पाऊण किलोचा पेरू आल्याची बातमी कळली. ती म्हणजे आताच्या
onsite पेक्षा मोठी बातमी होती. विकणाऱ्या व्यक्ती कडून त्याची इथम्भूत
माहिती मिळवल्यावर तो आपल्याला परवडणार नाही असे वाटून झालेला हिरमोड, आई
कडे त्याच्यासाठी धरलेला हट्ट, त्या काकांनी "आवडल्याय न पोराहो, मग जा
की घेऊन " असे म्हणत फुकट देऊ केलेला तो मोठा पेरू, तत्क्षणी "You made my
day" असे चेहऱ्यावर उमटलेले भाव, त्यानंतर तो घरी आणल्यानंतर लगेच खाऊन 
संपायला नको म्हणून लपवून ठेवलेले ते दोन दिवस, आणि दोन दिवसांनी
कापल्यानंतर घरातील सगळ्यांनी एकत्र बसून घेतलेले आस्वाद. कधीही विसरू शकत
नाही असे ते क्षण.

नंतर परत इथे शिक्षण चालू झाले की सगळे
चोचले बंद व्हायचे. शाळेतल्या मधल्या सुट्टीत शाळेबाहेर उभ्या असलेल्या
पेरूवाल्या काकांकडे धाव घ्यायचो. पण खिशात पैसे नसल्याने अधाशी नजरेने ते
बघण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. पेरू कापताना त्याच्या देठाचा भाग जर
जास्त कापला गेला की तो खाऊन त्या पेरूची चव "predict" करण्याचा प्रयत्न
करायचो. यातच मग " कोणाचे दात जास्त चांगले? " या स्पर्धेचे "कोण लवकर झडप घालून देठाचे काप जास्त खातो" यामध्ये रूपांतर व्हायचे.

त्यानंतर

बरेच वर्षे गेली. आयुष्य सावरण्याच्या गडबडीत हि माझी आवड कुठे लुप्त झाली
कुणास ठाऊक? त्यानंतर परत माझा पेरू शी संबंध आला तो विमानतळावर. तेथील
सामान तपासणी करणाऱ्या माणसाने " You can't take this with you" असे म्हणत
माझ्या सामानातील पेरू बाहेर काढून चक्क फेकून दिले. आईने मला खूप आवडतात
म्हणून
आवर्जून आणून दिले होते. क्षणात माझ्या मस्तकात रागाची भावना उमटली. अनेक
विनवण्या करूनही यश आले नाही. शेवटी माझ्या या जिवलगाशिवायच मी देश सोडून
गेलो.

असाच एके दिवशी  मित्राची वाट बघत कार रस्त्याच्या
बाजूला उभी केली होती, अगदी फुटपाथ ला चिकटून. तेवढ्यात एक पेरू गाडीच्या
डाव्या खिडकीतून आत गाडीत पडला. "न्यूटन" ला सफरचंद पडल्यावर आणि त्यानंतर
शोध लावल्यावर जेवढा आनंद झाला असेल त्यापेक्षा कैक पटींनी आनंद मला झाला.
वाकून बघितले तर एक पेरू विकणारी मुलगी टोपलीत पेरू घेऊन फुटपाथवरून जात
होती. अन जागा नसल्याने खेटून जाताना तो पेरू गाडीत पडला असावा.

 " साह्येब घ्या ना  एक पेरू,  छान हिरवेगार आहेत. "

  " नाही नको "

" अहो साह्येब घ्या, लाल पेरू बी आहे. तुम्ही कधी खाल्ला नसेल असा, थोडेच उरलेत ५-६, घ्या एखादा "

पटकन
सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यातून झरझर सरला. मी काही रुपडे देऊन सगळे
टोपलीतले पेरू खरेदी केले .  लगेच खायला सुरवात केली. वेदनेने विव्हळ 
झाल्यावर आठवले की बहुतेक दातांचे "रूट क्यानोल" झाले आहे. जेव्हा पेरूसाठी
मी व्याकूळ व्हायचो अन दात चांगले होते , तेव्हा ते कधीच मिळाले नाहीत. आता
टोपलीभरून पेरू समोर असूनही खाण्यासाठी चांगले दात नाहीत. अरेरे!!

अजूनही ते पेरू फ्रीज मध्येच आहेत. त्या लाल पेरूची चव मी अजूनही चाखली नाहीये.

कारण, आता स्पर्धा लागते ती दातांमध्ये, कोणी पहिला तुकडा तोडायचा याची.

सागर