हे असे घडणार नक्की!

गझल
हे असे घडणार नक्की!
मी पुन्हा फसणार नक्की!!

आवरू दे बाडबिस्तर....
मी उद्या नसणार नक्की!

शेवटी काटे, अरे, ते....
एकदा रुतणार नक्की!

वाट ही काट्याकुट्यांची.....
पार मी करणार नक्की!

मी तुझ्या झालो हवाली!
काळजी मिटणार नक्की!!

घोकले तेही विसरलो....
आज ती रुसणार नक्की!

फाटले आभाळ इतके;
दगडही द्रवणार नक्की!

शेपटीवर पाय पडला....
तो मला डसणार नक्की!

प्राक्तना! मी शब्द  देतो....
जिंदगी जगणार नक्की!

शीड आहे फाटलेले!
नाव भरकटणार नक्की!!

कोण सांभाळेल तुजला?
मद्य हे चढणार नक्की!

ओत तू पाणी कितीही,
वीष ते भिनणार नक्की!

पानगळ येते नि जाते!
मी पुन्हा फुलणार नक्की!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१