येते समोर जेव्हा ती, फक्त पाहतो मी!

गझल
येते समोर जेव्हा ती, फक्त पाहतो मी!
आहे तिचाच दावा की, फार बोलतो मी!!

मी एकदाच गेलो स्वप्नी तिच्या पहाटे....
म्हणते अजूनही ती...स्वप्नात चालतो मी!

अधरी कधी फुलांच्या, हृदयी कधी कळ्यांच्या;
मधुनीच कैक वेळा काट्यात राहतो मी!

जुळवून भंगलेल्या ठिकऱ्याच काळजाच्या;
दररोज कल्पनेचा प्रासाद बांधतो मी!

हे लक्ष लक्ष तारे, हे मंद मंद वारे....
तुज सांगतील सारे की, काय सोसतो मी!

मी बोलतो तिच्याशी मनसोक्त कैक वेळा!
राहून मात्र जाते जे खूप घोकतो मी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१