गझल
मीच मोती शिंपल्याचा, शिंपलाही मीच आहे!
चित्रही माझेच आहे, कुंचलाही मीच आहे!!
बांधणारा मीच होतो, सोडणारा मीच आहे!
मीच आहे पंख दोन्ही, शृंखलाही मीच आहे!!
त्या कुण्या कुब्जेतही साक्षात माझे रूप आहे!
कामिनीच्या अन् कटीची मेखलाही मीच आहे!!
मी निथळणाऱ्या कुणाच्याही अरे घामात आहे!
झोपडी माझीच आहे, बंगलाही मीच आहे!!
भक्त मी, भक्तीतही मी, शास्त्र मी, शास्त्रज्ञही मी!
मीच विज्ञानात आहे, अन् कलाही मीच आहे!!
म्यान मी, तलवार मी, ती ढालही पण मीच आहे!
मीच ती फिर्याद अन् तो फैसलाही मीच आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१