हा गंध मोगऱ्याचा

माझ्याच आसवांशी संवाद साधणारा

येतो कुठून आहे  हा गंध मोगऱ्याचा.

मी मोहरून जाता मन मोहरून येते
बेबंद बरसणारा  हा गंध मोगऱ्याचा.

पाउस हा विरागी बरसून आज गेला
मृदगंध आज झाला  हा गंध मोगऱ्याचा.

प्रत्येक सांजवेळी म्हणता शुभंकरोती 
अंधार जाळणारा  हा गंध मोगऱ्याचा.

कोणितरी कवेशी यावे असे नीजाया
तो स्पर्श कोवळासा  हा गंध मोगऱ्याचा.

हे बंध रेशमाचे विरले जरी कधिचे 
श्वासात मात्र उरला  हा गंध मोगऱ्याचा.