कुणाला हे दिसू नाही दिले मी आंधळा आहे!

गझल
कुणाला हे दिसू नाही दिले मी आंधळा आहे!
तसे आता, कुठेही जा, फसाया सापळा आहे!!

उन्हाने आणली द्याया मलाही सावली थोडी....
जरा हा नेहमीपेक्षा उन्हाळा वेगळा आहे!

मलाही वाटले माझ्या घराची राख होताना....
दिवाळीचा जणू माझ्या घरीही सोहळा आहे!

समजले आज पहिल्यांदा नव्हे मी एकटा येथे!
उभा माझ्या चितेभवती पुरा गोतावळा आहे!!

तुला काळीज मी माझे दिले काढून हातावर....
कुठेही जायला आता तसा मी मोकळा आहे!

जरा हलक्याच हातांनी, पुन्हा ये, सोडवू गुंता!
तुझ्यामाझ्यातला धागा तसा हा कोवळा आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१