गझल
शब्द जेथे संपतो, माझी तिथे सुरुवात होते!
हाक जेथे ऐकतो, माझी तिथे बरसात होते!!
दोष नाही वादळंचा, दोष नाही ओंडक्यांचा!
मी बुडालो त्यात माझ्या एकट्याचे हात होते!!
लाट होती वेंधळी अन् आंधळा होता किनारा!
एकमेकांच्या बिचारे सारखे शोधात होते!!
सोडताना प्राणही तो तेच गाणे गात होता....
त्याचिया रक्तातल्या प्रत्येक जे थेंबात होते!
या जगाला फक्त दिसले ताटवे माझ्या फुलांचे;
बोचणारे सर्व काटे माझिया हृदयात होते!
रोज का मिळतात कोणा पंचपक्वान्ने सुखाची?
गोड मानायास शिकलो, काय जे ताटात होते!
काय मी बोलू, कुणाला काय सांगायास जाऊ?
भेटलेले लोक सारे आपल्या नादात होते!
ओठ कायमचेच आता टाचले आहेत आम्ही......
रंग सारे जाहले पाहून जे वादात होते!
मी मनावर घ्यायची खोटीच होती फक्त बाकी;
वाचलो असतो सहज मी, माझिया हातात होते!
का न व्हावे जिंदगीचे माझिया गाणे सुरीले?
सूर मी साक्षात जगलो, सूर अंगांगात होते!
कल्पवृक्षाचीच किमया काय ही आहे म्हणावी?
वांच्छण्या आधीच नजराणे उभे दारात होते!
लागला स्वप्नास माझ्या केवढा माझा लळा हा.....
आज प्रत्यक्षात आले, काल जे स्वप्नात होते!
ओळखीचा चेहराही आज ओळख दाखवेना.....
कोण जाणे लोक सारे कोणत्या तोऱ्यात होते!
कोठुनी सुचतात गझला? अन् कसे हे शेर स्फुरती?
आज कळते सर्व मिसरे माझिया श्वासात होते!
झगमगाटेनेच दुनियेचे किती दिपलेत डोळे!
जे खरे होते हिरे ते मात्र अंधारात होते!!
-------प्रा.सतीशदेवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१