सदिच्छा..
असे उजाडावे । मनाच्या क्षितीजी ।
नुरावी काळजी । नावालाही ॥
लख्ख व्हावे सारे । हृदय गाभारी ।
प्रकाशाची झारी । बरसावी ॥
मोकळे मोकळे । होताच आकाश ।
कुठला आवेश । नसो तेथे ॥
स्वैर वारा वाहे । किंवा झरा मुक्त ।
व्हावे बंधमुक्त । चित्त तैसे ॥
असावा तयात । प्रेमाचा ओलावा ।
सुखाचा गारवा । सदोदित ॥
हीच एक आस । मनी तोची ध्यास ।
न करी उदास । जगदीशा ॥