हॅलोऽ हॅलोऽऽ

     माझं गांव चौधरा... अगदी लहानसं खेडं... पन्नास-साठ घरांची वस्ती...माझं पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण गांवापासून एक-दीड  कोस दूर असलेल्या निळोणा या गांवाला झाले.      त्यानंतरचे पाचवी ते बी.कॉम. पर्यंतचे कॉलेजचे शिक्षण गांवापासून तीनक कोस दूर असलेल्या यवतमाळ या शहरात झाले.      त्यावेळी दुकान, ऑफिस, सिनेमा इत्यादी ठिकाणी टेलिफोन वर लोकं बोलत असल्याचे मी त्या शहरात पाहत होतो.      खेड्यामध्ये टेलिफोन नसल्यामुळे लोकांना त्याचे कुतूहल वाटत असे. म्हणून मी लोकांना त्याची नक्कल करून दाखवायचं ठरविलं.      त्यावेळी मी कॉलेजमध्ये प्रि. कॉमर्स म्हणजे अकरावीला शिकत होतो. सुट्टीच्या किंवा एखाद्या सणासुदिच्या दिवशी मी घरी येत होतो.      माडी पोर्णिमेच्या दिवशी चन्द्राचा पांढराशुभ्र प्रकाश असतो. त्या दिवशी रात्रीचे जेवण करुन लोकं बाहेर येऊन बसतात. एकत्र येऊन गप्पागोष्टी करणे, खेळ खेळणे, गमती-जमती करणे, मनोरंजन करणे इत्यादी मौज-मजेच्या कार्यक्रमात दिवसभराचे कष्ट विसरुन आपले मन रमवीत  असतात. गुणी लोकांना आपआपली कला प्रदर्शीत करण्याची संधी त्यावेळी मिळत असते. लोकांचेही त्यानिमित्ताने मनोरंजन होत असते. मी सुध्दा माझा मित्र अर्जुन याला घेऊनटेलिफोनची नक्कल करायची ठरवलं.      मी एकीकडे माझ्या एक कानाला हात लावून हॅलो हॅलो म्हणत होतो. दुसरीकडे अर्जुन त्याच्या कानाला एक हात लावून दुसर्‍या हाताने जोरात हालवल्याची ऍक्टींग करीत होता. मी त्याला म्हणत होतो की, ’ अरे मी तुला हॅलो हॅलो म्हणतोय, तू बोलत का नाहीस...? तू काय करीत आहेस... ? ’      ‘तू सांगितल्या प्रमाणे मी हालवत आहे ना...’ असे तो म्हणत होता.      ‘अरे तसे नाही. फोनवर बोलताना सुरुवातीला हॅलोऽऽ हॅलोऽऽऽ म्हणत असतात. नंतर बोलायचं  असते.’      लोकं या नकलेला पोट धरुन हसत होते.      टेलिफोन आपल्याकडे असणे म्हणजे त्यावेळी स्वप्नवत होते. परंतु आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.      त्यावेळी टेलिफोन म्हणजे श्रीमंताची मिरासदारी होती.एकदा मुंबईला १९९४ मध्ये माननीय कांशीरामजी यांची सभा होती. त्या सभेला माजी पंतप्रधान माननीय व्हि.पी.सिंग आले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले होते की, ‘टेलिफोन डिरेक्टरी मधील नांवे पाहिले की, कोण श्रीमंत व उच्चवर्णीय आहेत ते कळतात.’ आता टेलिफोन डिरेक्टरी मधील नांवे पाहिले की, कोण श्रीमंत व उच्चवर्णीय आहेत ते कळत नाही!      माझ्याकडे एवढेच नव्हे तर माझे बहुतेक नातेवाईक, मित्र मंडळीकडे सुध्दा आता टेलिफोन आलेला आहे. माझे मुले मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ सारख्या उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे व औरंगाबाद या ठिकाणी शिकत होते. त्यामुळे त्यांचेशी संपर्क ठेवण्यासाठी मला टेलिफोन घेणे अत्यंत आवश्यक झाले होते.      पुर्वी नक्कल करीत होतो! आता प्रत्यक्षात उतरले आहे. हे कशामुळे शक्य झाले आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच! ते जर नसते तर मी कुठेतरी मोलमजुरी करीत बसलो असतो.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, की ‘शिका’ ते माझ्या आई-बाबां-दादाने ऐकले. मला शाळेत टाकून शिक्षण घेऊ दिले.बाबासाहेबांनी स्कॉलरशिपची सवलत मिळवून दिली. कुणीतरी एका काव्यात म्हटले आहे की, ‘स्कॉलरशिप आमची आई-बाप झाली होती.’ खरचआहे. स्कॉलरशिप जर मिळाली नसती तर आम्ही शिकूच शकलो नसतो!      त्यावेळी मला पाचवीपासून दहावीपर्यंत पंधरा रुपये स्कॉलरशिप मिळत होती. कॉलेजमध्ये होस्टॅलच्या मुलांना चाळीस रुपये मिळत होती. म्हणून मला आर्थिक आधार झाला. त्यामुळे मला बी.कॉमपर्यंत शिक्षण घेता आले.      नोकरीमध्ये बाबासाहेबांनी राखीव जागेची सवलत मिळवून दिली. जर राखीव जागेची सवलत नसती तर कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी खात्यात मला नोकरी मिळाली नसती.राखीव जागेवर पुढे मला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये लिपिकाची नोकरी मिळाली. त्यानंतर महावितरण कंपनीमध्ये लेखाधिकारी या पदापर्यंतआरक्षणामूळेच पदोन्नती घेत घेत शेवटी सेवानिवृत्त झालो.      मी शिकलो, नोकरीला लागलो. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यामुळे माझ्या लहान भावाला एम.बी.बी.एस. आणि एम.एस. असे वैद्यकीयशिक्षण घेण्यासाठी मदत करू शकलो. मी माझ्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊ शकलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक प्रगल्भतेच्या संकल्पेनुसारएक मुलगा वकील, दुसरा डॉक्टर व  मुलगी कॉंम्पूटर इंजिनिअर झाली. एवढे आमूलाग्र परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांमुळेच घडून आले.      मी सप्टेंबर २००७ साली अकोला येथे सेवानिवृत्त झालो. त्यावेळी माझ्या कार्यालयात झालेल्या निरोप समारंभाच्या वेळी मला शाल व माझी पत्‍नीकुसुम हिला साडी देऊन आमचा उभयंताचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मी माझ्या भाषणात सांगितले होते, की ‘मी नोकरीला लागलो, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच! बाबासाहेब आंबेडकरांमुळेच केवळ मागासवर्गीयाची प्रगती झाली, असे नव्हे तर इतर सर्व समाजाची प्रगती झाली. या देशाची प्रगती झाली. कारण एखाद्या शरीराचा काही भाग हा विकलांग अवस्थेत असेल तर ते शरीर सुदृढ म्हणता येत नाही. तसेच देशामध्ये जर बहुतांश लोक हेदुख:, दारिद्र व अज्ञानात जगत असतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. त्यामुळे केवळ मीच नव्हे तर सर्वांनी त्याचे ऋणी असायला पाहिजे.’ ही बाब मी माझ्या निरोप समारंभाच्या वेळी आवर्जून सांगितली होती. माझी तर अशी अपेक्षा आहे, की जो जो सेवानिवृत्त होईल त्यांनी आपल्या निरोप समारंभाच्या वेळी ही बाब प्रकर्षाने मांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती जोपासावी. त्यामुळे उपस्थित असलेल्या इतर सर्व जाती-धर्माच्या कर्मचारी/अधिकार्‍यांना बाबासाहेबांचे मौल्यवान कर्तृत्व नजरेस येईल.      एकेकाळी मी गंमत म्हणून हॅलोऽऽ हॅलोऽऽऽ म्हणत होतो. आता प्रत्यक्षात हातात टेलिफोन व मोबाइलवर हॅलोऽऽ हॅलोऽऽऽ म्हणतो, तेव्हा माझं मलाच नवल वाटून गालातल्या गालात खुदकन हसत राहतो.