मी न उलगडली तुझ्या पहिल्याच पत्राची घडी!

गझल
मी न उलगडली तुझ्या पहिल्याच पत्राची घडी!
थांब! गिरवू दे मला प्रेमातली बाराखडी!!

मीच होतो बिनहिशोबी एकटा बहुधा तिथे.....
घेवुनी होता उभा जो तो स्वत:ची चोपडी!

थेंब अश्रूंचा नको सांडूस येथे एकही;
रोज नेमाने इथे भरते टग्यांची चावडी!

ठेव सांभाळून स्वप्नांच्या तरी ठिकऱ्या तुझ्या;
बांधता येईल एखादी कुणाला झोपडी!

कोणत्या शब्दात वर्णावे तुझे लावण्य मी?
कल्पना साऱ्या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१