तुझ्या स्मृतींच्या सरोवरी डुंबतो कधीचा!

गझल
तुझ्या स्मृतींच्या सरोवरी डुंबतो कधीचा!
मनोगतांचे महाल मी बांधतो कधीचा!!

हरेक वस्तूत तूच मजला दिसे अताशा......
तरी कसा मी तुलाच धुंडाळतो कधीचा!

कशास मी  पौर्णिमेकडे याचना करावी?
पिऊन मी चांदणे तुझे झिंगतो कधीचा!

असून इच्छा फुले कधी अंथरू न शकलो!
अजून काटेच  मी इथे मोजतो कधीचा!!

मला तसे खळखळून होते हसायचे पण........
तडेच मी काळजातले सांधतो कधीचा!

किती युगे लोटली, नसे मोजदाद काही;
प्रकाश धुंडाळण्यास  मी चालतो कधीचा!

अजून वर्मी न लागला बाण कोणताही;
हरेक माणूस नेम, बघ , साधतो कधीचा!

विषारलेले अतीत माझे धुऊ कितीदा ?
मनास वर्षानुवर्ष खंगाळतो कधीचा!

उगाच नाही झळाळणारी गझल लिही तो
 व्रतस्त राहून तोच  तेजाळतो कधीचा!

दया न आली अजून मृत्यूस काय त्याची?
हयातभर तो जिण्यासवे झुंझतो कधीचा

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१