सावलीनेही स्वत:च्या टाळले होते मला! (संकेत तरही गझल)

संकेत तरही गझल

सावलीनेही स्वत:च्या टाळले होते मला!
तूच दु:खा! शेवटी सांभाळले होते मला!!

आजही रस्त्यात जो तो आदराने वाकतो.....
ज्या ठिकाणी या जगाने जाळले होते मला!

काल त्यांना गुणगुणावी वाटली माझी गझल....
मात्र गाताना खुबीने गाळले होते मला!

चार दिवसांचा दुखवटा! ना निशाणी राहिली.....
माझिया स्मरणांसकट फेटाळले होते मला!

आज वार्धक्यात पैशाचे करू मी काय रे?
भरजरी काळात ज्याने टाळले होते मला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१