गझल
माझेच दु:ख बहुधा इतके भिकार होते!
झोळीत सांत्वनाचे काही तुषार होते!!
तेव्हा जमेस माझ्या सारे नकार होते!
नाकारल्याप्रमाणे काही ऋकार होते!!
हाती हुकूम होते तोवर सलाम होते!
मी हारलो तसा ते सारे पसार होते!!
घोटाळता न आले मज भोवती कुणाच्या;
माझ्याशिवाय बाकी सारे हुशार होते!
हे रंग, गंध माझे नव्हते पसंत त्यांना;
ते कागदी फुलांचे शौकीन फार होते!
कैफात कोणत्या मी होतो, मला न कळले!
जगलो असा जणू ते जगणे जुगार होते!!
जाळीत जीव ज्यांचे आयुष्य सर्व गेले......
रचण्या सरण स्वत:चे ते का भिणार होते?
माझ्यासवेच माझी चाले किती लढाई!
सामर्थ्यवान सारे माझे विकार होते!!
सद्भावना भलेही असतील अंतरंगी.....
पण वैखरीत त्यांच्या भलते विखार होते!
ठेचाळलो कसा मी? रक्ताळलो कसा मी?
माझ्या कृतीपुढेही माझे विचार होते!
समजूत घातली अन् कोणी दिले दिलासे....
ते सर्व वंचनांचे नाना प्रकार होते!
नव्हताच मेळ माझा माझ्यासवे कधीही.....
नशिबास का म्हणू मी, की, ते चुकार होते!
आजन्म सोबत्यांचा होता जरी गराडा....
येणार सांगता ना, की, कोण यार होते?
घनदाट जंगले ही आहेत माणसांची;
शहरात या कुठेही हल्ली शिकार होते!
केल्या चुकाच नुसत्या, शिकलो न मात्र काही....
नुसतेच कनवटीला अनुभव चिकार होते!
होत्या दिसावयाला त्या फक्त दोन ओळी....
संपूर्ण जीवनाचे पण, त्यांत सार होते!
प्रत्येक शेर माझा का लागला जिव्हारी?
शेरात शब्द नव्हते, माझे जिव्हार होते!
काळानिळाच दिसतो का चेहरा शवाचा?
त्याची हयात म्हणजे जालम विषार होते!
त्यांची उपोषणांची निष्ठा अनन्य होती!
त्यांच्या कह्यांत त्यांचे सारे डकार होते!!
इच्छेनुसार आलो जन्मासही पुन्हा मी!
विधिलेख तोच होता, पण, फेरफार होते!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१