वणव्यात वास्तवाच्या स्वप्ने जळून गेली!

गझल
वणव्यात वास्तवाच्या स्वप्ने जळून गेली!
बहरात ऐन माझी पाने गळून गेली!!

जाऊ नकोस माझ्या हसण्यावरी अशी तू;
हुरहूर मीलनाची मजला छळून गेली!

जवळून एवढ्या मी मरणास पाहिले की,
वाटे निघावयाची घटका टळून गेली!

मन निग्रही म्हणाले....फेकून दे मुखवटे....
नुसत्याच निश्चयाने भीती पळून गेली!

माझाच अस्त माझ्या डोळ्यांसमोर झाला.....
माझ्या समोर माझी छाया वळून गेली!

होते सुपात म्हणुनी दाणे भ्रमात होते!
नियती क्रमाक्रमाने त्यांना दळून गेली!!

मी एक जखम होतो, दुनियेस जाहलेली!
मी प्राण सोडल्यावर ती साखळून गेली!!

मज ज्या क्षणास होती फर्मावलीस फाशी.....
तेव्हाच, फास, घटिका ती आवळून गेली!

सूर्यास खुद्द जेव्हा त्यांनी कह्यांत केले.....
आशा उजेडण्याची मग मावळून गेली!

पणतीस माझिया ना अप्रूप तेवण्याचे!
पण, वादळात सुद्धा ती पाजळून गेली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१