गझल
तुला पाहुनी भास झाला मनाला!
किनारा जणू लाट होऊन आला!!
जरी काळजी घेतली कुंपणांनी;
कळ्यांचा तरी जाहला बोलबाला!
तसे खूप झाले जमा लोक दारी....
किती सांग आले तुझ्या सांत्वनाला?
तुझी वाट बघण्यात नाही समजले....
कधी रात्र सरली? कधी सूर्य आला?
नको आटवू रक्त तू ऐक माझे;
इथे मेळ नाही कुणाचा कुणाला!
कसे कान टवकारले चांदण्यांनी?
असा आमुचा काय संवाद झाला?
सतत जो झुरे, काय नाहीच त्याने....
रिता वाटतो नेहमी त्यास प्याला!
गझल रोज जगतो! गझल रोज लिहितो!
गझलकार म्हणतात त्या माणसाला!!
कला प्रांत, जेथे अहंकार नसतो!
कलावंत भिडतो सरळ काळजाला!!
टवाळीच केली किती माणसांनी;
शहाणा खरा तोच कळले जगाला!
भले पंचपक्वान्नही द्या कितीही....
गुळाची रुची काय त्या गाढवाला?
कशाला हवा मान, पैसा, प्रसिद्धी?
पुरे प्रेम असते जगाया जिवाला!
ढगांनो! किती वाट बघतात डोळे!
कुठे चालला घेवुनी पावसाला?
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१