गझल
मारेकऱ्यास माझी कळली कशी खुशाली?
चुकुनी न एकदाही हसलो अजून गाली!
मी मंद तेवणारा होतो दिवा परंतू....
माझ्यामुळे उजळल्या लाखो इथे मशाली!
वठला तसाच तितक्या वेळा पुन्हा बहरला!
माझ्यासमान आहे हा कोण भाग्यशाली?
आहे लबाड भारी आकाश तारकांचे;
ते चोरते गुलाबी ओठांमधील लाली!
ते लागले मलाही समजू बरोबरीचा;
आला न राग मजला, पण, कीव मात्र आली!
हे कोणत्या दिशेने आयुष्य चाललेले?
विधिलेख कोणता या लिहिला असेल भाली?
सोडून सूर्यमाला तो गझलसूर्य गेला....
गझलेस अन् मराठी उरला न कोण वाली!
कित्येक तोतयांनी कंपू तयार केले!
अस्तित्व टिकवण्याची तर त्यांस सोय झाली!!
ते संतसज्जनांच्या आहेत चेहऱ्यांचे!
आतून पाहिले तर आहेत ते मवाली!!
आजन्म हेलपाटे कोर्टात घातले मी....
तक्रार कोणतीही ना लागली निकाली!
माझी उपस्थितीही त्यांना नकोच होती....
वाटेमधील त्यांच्या ती एक धोंड झाली!
पोटांवरून कळते आहेत ते पुढारी!
पोटे अरे कशाची, आहेत त्या पखाली!!
नाही उगाच माझ्या शब्दांस धार आली!
मी पाहिल्या जगाच्या जवळून हालचाली!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१