गझल
ठेवले शाबूत त्यांनी पंख ऐसे वाटले!
मात्र त्यांनी नेमके आकाश माझे छाटले!!
मी असे काही खुबीने रोज ते केले रफू;
की, न आले ओळखू आयुष्य कोठे फाटले?
राख कोणाची तरी झाली, कुणी साकारले....
जाळले कोणी, कुणी संसार त्यांचे थाटले!
दिलजमाई सावलीशी जाहली नाही कधी!
मी उभे आयुष्य माझे एकट्याने काटले!!
मी घराचे दार माझ्या लोटले नाही कधी;
माहिती नाही.... मला कोणी कितीसे लाटले!
चार किरणांची अपेक्षाही न आता राहिली....
सूर्य सुद्धा येथले आहेत सारे बाटले!
माझियासाठी न माझ्या पापण्या पाणावल्या;
हे जगासाठीच माझे आज डोळे दाटले!
गायिले मी गीत, सहजी दादही तुम्ही दिली!
चार ह्या ओळी लिहाया रक्त माझे आटले!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१