एकमेकांना तसे आतून ते सामील होते!

गझल
एकमेकांना तसे आतून ते सामील होते!
ते कुठे माझ्याप्रमाणे एवढे गाफील होते?

आजपावेतो कधी केली न कागाळी व्यथांची.....
ज्या व्यथांशी शेवटी आयुष्य हे बांधील होते!

तू कधी होतेस जेव्हा गुणगुणाया ओठ माझे.....
बोलका एकांत होतो! मौनही मैफील होते!

काळजी त्यांना किती होती स्वत:च्या चेहऱ्यांची;
मुखवटे त्यांनी चढवलेले किती सत्शील होते!

कान टवकारूनही नाही कळू शकले फुलांना....
मी तिच्या डोळ्यात सारे वाचले तपशील होते!

मानतो, आरास किंवा रोशणाई मी न केली....
अनुभवांचे माझियापाशी किती कंदील होते!

नेमके त्यांनाच नाही टोप पदव्यांचे मिळाले....
जे खऱ्याअर्थी निपुण होते, किती काबील होते!

पाहुणे होते खवय्ये, सर्व मांसाहारप्रेमी!
चिकन सरले, मटण सरले, राहिले बोंबील होते!!

त्यामुळे ते लोक डोक्यावर मिरे वाटून गेले....
लाड तू केलेस त्यांचे, ते किती फाजील होते!

त्या बलात्कारीत व्यक्तीवर पुन्हा आघात झाले!
प्रश्न कोर्टातील सुद्धा केवढे अश्लील होते!

मी न विरघळलो स्तुतीने, वा कधी निंदेस भ्यालो!
माणसे छापील होती! शब्दही छापील होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१