राधा - वेणू
कालिंदी जळ झुळझुळ झुळझुळ
मुरलीरव तो सुस्वर मंजुळ
अशा अवेळी या डोहावर
कोण निघाली इतुकी झरझर
वस्त्र उतरले खांद्यावरचे
नयनींचे ओघळले काजळ
गालावरती सुकलेले ते
किती काळचे अश्रू निश्चळ
काठावर नसताना कोणी
अंतरात का भासचि केवळ
मिटता डोळे पुन्हा उमटला
बासुरी स्वर तो मंजुळ मंजुळ
मिटूनी डोळे बैसे राधा
अंतरात ती मूर्ति सावळ
कान्हा नसता पावा कुठुनी
जमले बघण्या अवघे गोकुळ