कल्लोळ काळजाचा नाही कळू दिला मी!

गझल
कल्लोळ काळजाचा नाही कळू दिला मी!
नाही कुणास माझा पत्ता मिळू दिला मी!!

ज्या बेचिराख झाल्या, त्या झोपड्याच होत्या....
नाही महाल तुमचा कोठे जळू दिला मी!

उगवेल सूर्य ऐसी खात्री मनास झाली;
तेव्हाच प्राण माझा अंती ढळू दिला मी!

हृदयात रोज माझे प्रतिबिंब पाहतो!
अद्याप  आरसा हा नाही मळू दिला मी!!

प्रत्येक गोष्ट झाली वेळेवरीच माझी.....
नाही मुहूर्त कुठला केव्हा टळू दिला मी!

रस्ताच सोबतीला घेऊन मी निघालो!
वाटेत पाय कोठे नाही वळू दिला मी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१