गझल
सावलीनेही स्वत:च्या टाळले होते मला!
तूच दु:खा! शेवटी सांभाळले होते मला!!
आज त्यांच्या कुंतली आहे जरी हे चांदणे;
एक होता काळ त्यांनी माळले होते मला!
काल त्यांना गुणगुणवी वाटली माझी गझल....
मात्र गाताना खुबीने गाळले होते मला!
लाट मी होऊन तुजला भेटलो कित्येकदा!
तू तटा, कित्येकदा फेटाळले होते मला!!
तू नको मानूस पण, साक्षात ही वस्तुस्थिती.....
पौर्णिमेच्या चांदण्यांनी जाळले होते मला!
माफ कर मृत्यो! मला, मी भेटलो नाही तुला;
भोवतीच्या माणसांनी पाळले होते मला!
आज पटते की, न आली वाचता मज माणसे....
टाळले कोणी? कुणी कवटाळले होते मला?
ये, पुन्हा आता नव्याने घे मला वाचायला!
फार पूर्वी एकदा तू चाळले होते मला!!
आज तो आला कराया मलमपट्टी शेवटी!
याच काळाने कधी रक्ताळले होते मला!!
पाठ माझी थोपटावी, काय मी केले असे?
आठवे आई, जिने कुरवाळले होते मला!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१