एकटा मी ~~~~~
आयुष्य भासे वाळवंट एकटा पडलो मी
निराशा मज व्यापून राहते एकटा पडलो मी
हिरवळ मजला मृगजळ वाटे एकटा पडलो मी
अपुऱ्या स्वप्नांच्या आठवणीत एकटा पडलो मी....
जीवन झाले रात्रीचा समुद्र ~~
लाटांचा भीषण गोंगाट अन वाऱ्यांचे रौद्र
दिशाहीन प्रलयात सापडले मनाचे शीड
राहिले दूर किनारे एकटा पडलो मी....
माणसांच्या जत्रा, नुसता रंगबिरंगी पसारा
अथांग विश्व भोवती पण सापडेना सहारा
निशा-प्रकाशाचा नुसताच खेळ, दीपस्तंभ मिळेना
विश्व बनले एक कोडे, उलगडता उलगडेना
स्वता:तच मग अडकत गेलो, एकटा पडलो मी
आयुष्य भासे वाळवंट एकटा पडलो मी....
असतात सारी नाती कोरी, नसतो कुणी कुणाचा
स्वार्था भोवती गुंग सारे, ' वेळेचा' केवळ बुरखा
रक्ताच्या नात्यांतून जेव्हा फसला गेलो मी...
आयुष्य भासे वाळवंट एकटा पडलो मी....
मीच दोषी मीच नाकर्ता
मनासही ना ये सावरता
शिशिर वसंत ग्रिश्म ही गेले...
जळत राहिलो मी
आयुष्य भासे वाळवंट एकटा पडलो मी....
विषण्णतेचा भोवरा, देहाने फिरत राहातो मी
मळकट बेरंग जाळीच फक्त वीणत राहतो मी
मरता न ये इतकीच आशा, जगत राहतो मी
विश्वातील एक कृष्ण विवर, उरून राहिलो मी....
अपुऱ्या स्वप्नांच्या आठवणीं, एकटा पडलो मी
आयुष्य आता वाळवंट, एकटा पडलो मी