तुझी पाठ नाही जात डोळ्यांपुढून..
पावसाचा थेंब ओघळताना पाहायचा आहे मला तुझ्या पाठीवरून...
मला ए ना.. बघायचा आहे प्रवास त्या थेंबाचा..
अगदी शेवट पर्यंत...
मला मागायचे आहे देवाकडे त्या थेंबासाठी सामर्थ्य..
प्रवास पूर्ण व्हावा त्याचा म्हणून
आणि
मलाही जमावे तोपर्यंत श्वास रोखून धरायला..!
त्याची वळणे,
त्याने मागे सोडलेल्या खाणा-खुणा..
त्याचे उतारावरूनचे घसरणे..
त्याचे एखाद्या ओढ्यासारखे दरी खोऱ्यातून अदृश्य होणे, पुन्हा अवतरणे..
मला पाहायचे आहे रोखून..
प्रेमाने...
कौतुकाने....
मत्सराने...!
मग अगदीच नाही राहवेल ना.. तेव्हा.. तेव्हा ठेवेन मी ओठ त्यावर..
थांबवेन त्याचे माझ्या संपत्तीवरले अतिक्रमण..
आणि करेन ओठांनी उलटा प्रवास सुरू.. त्याने सोडलेली वाट पुसून नवे ठसे उमटवण्याचा...!
प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं जरी असलं मी,
की तो इकडे तिकडे नव्हता गेलेला..
संशय असेल ना अगं पण मनात माझ्या..
त्यामुळे मी शोधेन त्याच्या खाणा खुणा..
इकडे..
तिकडे..
सगळीकडे..!
हरवून भान,
विसरून जाईन मी की.. की..
माझ्या त्याच्या खुणा मिटविण्याच्या प्रयत्नामध्ये,
उमटत आहेत शेकडो.. हजारो नवे ठसे...
एकदम येईल तेही लक्षात माझ्या...
मधूनच माझ्यावर रोखलेले तुझे डोळे करून देतील मला जाणीव..
की, " अरे??? हे काय?? सगळीकडेच हे नवे ठसे...?? "
मग हे ही ठसे पुसण्याचा नवा प्रयत्न सुरू होईल माझा...
अजूनही जास्त उत्कटतेने..
प्रत्येक प्रयत्नातून ठसेच वसतील मग देहभर...
थोड्यावेळाने एकमेकांच्या मिठीतून त्या ठस्यांकडे रागाने पाहत आपण म्हणू "वाईट्ट होता तो थेंब...! एवढासा होता, पण किती उत्पात घातला त्याने..! "
म्हणूनच..
म्हणूनच ए ना..
पावसाचा थेंब ओघळताना पाहायचा आहे मला तुझ्या पाठीवरून...
(ऋतुगंध..! )