केवढा हा मुक्त कारावास आहे!

गझल
केवढा हा मुक्त कारावास आहे!
हर नदीला सागराचा ध्यास आहे!!   

माणसा, थांबव उधळखोरी जळाची....
खुद्द विहिरींना कधीची प्यास आहे!

मोल पैशाचे जिवापेक्षा न मोठे!
जीवघेणा हा तुझा हव्यास आहे!!

जे करायाला हवे मी तेच केले.....
हात देणे, त्यात कसला त्रास आहे!

पात्रतेपेक्षा जरा जास्ती मिळाले!
कोणती आता जिवाला आस आहे?

चालले आहे उधारीचेच जगणे......
मी तुझ्या नावेच घेतो श्वास आहे!

पावसाळे पाहुनी इतके समजले.....
सत्य कुठले? कोणता आभास आहे?

मान्य अस्ताव्यस्त मी, पण, जाणतो हे.....
हा प्रपंचाचा पसारा भास आहे!

ना अनासक्ती उगा आली मला ही;
काय मी सांगू किती सायास आहे!

मी जसे केले मला तुझिया हवाली;
वाटते जगणे विनासायास आहे!

आतला आवाज माझा ऐकतो मी!
ज्यावरी माझा अढळ विश्वास आहे!!

मोहमायांनो! नका मजला खुणावू;
मी कधीचा घेतला संन्यास आहे!

पोटचा गोळा जसा सोडून गेला.....
ना घशाखाली उतरला घास आहे!

जिंदगी माझी असावी कूट कोडे!
ते न सुटलेले ग्रहण खग्रास आहे!!

नाव ना  बघताच येते ओळखाया....
गंध प्रेमाचा तुझ्या पत्रास आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१