तुझी साथ म्हणुनीच तगलो कदाचित!

गझल
तुझी साथ म्हणुनीच तगलो कदाचित!
कधीचाच असतो निखळलो कदाचित!!

जरी एक निष्पर्ण मी वृक्ष होतो;
झुळुक भेटल्यानेच फुललो कदाचित!

अशी कोणती सांग, नस दाबली तू?
अशानेच मीही उसळलो कदाचित!

विधीलेख माझाच होता असा की,
धुवायास पापे निपजलो कदाचित!

स्वत:स्तव कधी फोडला मी न टाहो......
जगा जागवाया गरजलो कदाचित!

तृषा वाळवंटातली हिरवळीची.....
तिला पाहुनी मी बरसलो कदाचित!

तुझ्यापासुनी दूर नव्हतोच केव्हा!
अचानक तुला मी विसरलो कदाचित!!

मला पाहुनी लागला त्यांस ठसका!
खकाण्यापरी मी उधळलो कदाचित!!

कळप मेंढरांचे कसे शांत झाले?
जणू त्यांत मीही मिसळलो  कदाचित!

मला छाटण्याचाच निर्णय जहाला.....
जखम एक होतो.....चिघळलो कदाचित!

नसावा मला धस कुठे लागलेला......
अरे, मीच माझा उसवलो कदाचित!

रुजू लागलो मी! रुळू लागलो मी!
इथे शेवटी मी मिसळलो कदाचित!!

न मी राहिलो, का हुडकते मला जग?
जणू मी जगाला उमजलो कदाचित!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१