हे असे होईल काही, वाटले नव्हते!

गझल
हे असे होईल काही, वाटले नव्हते!
एवढे आभाळ केव्हा फाटले नव्हते!!

हात गगनानेच माझा सोडला होता;
पंखही मीहून माझे छाटले नव्हते!

चांगली आहे कसोटी आज डोळ्यांची;
एवढे अश्रू कधीही दाटले नव्हते!

हा असा दुष्काळ नव्हता पाहिला केव्हा;
माणसांचे प्रेम इतके आटले नव्हते!

लालसा होती तरीही संत तो होता!
लालसेने स्वत्व त्याचे बाटले नव्हते!!

रेटला आजन्म गाडा देशसेवेचा;
आपले संसार त्यांनी थाटले नव्हते!

दु:ख माझ्या पाचवीला पूजले होते!
कोणतेही दु:ख ओझे वाटले नव्हते!!

भाग्य तू पिसलेस जितक्या पोटतिडकीने;
कळकळीने तेवढ्या मी काटले नव्हते!

रक्त हृदयातील माझ्या ओतले होते;
कल्पनेने चित्र मी रेखाटले नव्हते!

आजही टिकवून आहे मी मन:शांती!
एवढे कोणीच मजला लाटले नव्हते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१