मला जसे सुचले, जमले तसे जगत गेलो!

गझल
मला जसे सुचले, जमले तसे जगत गेलो!
जिंदगीस मी सामोरा हसत हसत गेलो!!

गाव दूर होते, रस्ता बिकट खूप होता.....
अखेरचे अंतर, तर मी रडत कढत गेलो!

ठसठसायच्या जखमाही किती, चालताना.....
हसू चेहऱ्यावर ठेवत, कण्हत कण्हत गेलो!

वेंधळेपणा बघ माझा जगावेगळा हा.....
मुसळधार दु:खे होती, भिजत भिजत गेलो!

असा कोणत्या मातीचा मी असेन बनलो?
शोधण्यास ते, मजला मी खणत खणत गेलो!

मीच एक उरलो सरत्या पिढीची निशाणी!
हळू हळू का होईना, रुळत रुजत गेलो!!

सूर्य एक होतो, ज्याचे वय उतार झाले!
धर्म तळपण्याचा पाळत, निवत निवत गेलो!!

समीक्षकांनो! चालू द्या थयथयाट तुमचा.....
मी गझल भटांची होतो, मुरत मुरत गेलो!

तुझा फक्त ओझरताही स्पर्श बघ पुरेसा!
डवरल्या तरूसम मीही फुलत फुलत गेलो!!

मीच रान होतो, वणवा मीच लागलेला!
शहर बघ्यांचे होते, मी जळत जळत गेलो!!

काय काय अजुनी नाही कळत, हे समजले......
कमी कमी ताठा झाला, झुकत झुकत गेलो!

खुडायची होती त्यांना फुले सर्व माझी!
अचानक कसा मी त्यांना सलत सलत गेलो!!

कार्यभार आयुष्याचा आटपून झाला!
भेटण्यास मृत्यूलाही पळत पळत गेलो!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१