घर कितीक वेळेला मीच मोडले माझे!

गझल
घर कितीक वेळेला मीच मोडले माझे!
भोवऱ्यामधे तारू मीच सोडले माझे!!

त्या प्रभावळीमध्ये मीच शोभलो असतो.....
मीहुनी विनाकारण नाव खोडले माझे!

लागला मला जेव्हा पैलतीर खुणावाया.....
मी प्रसन्न चित्ताने पाश तोडले माझे!

ना कुणी तसूभरही शेवटी बदलले रे!
जन्मभर उगा डोके मीच फोडले माझे!!

जाहलो बहिष्कृत मी शेवटी अशासाठी.....
का भटांसवे गेले नाव जोडले माझे?

लागतेच पुण्याई सद्गुरू मिळायाला!
ना फुका भटांसंगे नाव जोडले माझे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१