धन्य तुका देखियला ....
लळा इतुका लागला
करमेना विठ्ठलासी
धाडी विमान देहूसी
राही आता वैकुंठासी
भक्ती-वैराग्याया खुणा
अंगी ठाकल्या रोकड्या
देव स्वर्गींचे धावोनी
घाली तुम्हा पायघड्या
मूर्तिमंत ब्रह्मरस
तुम्हाअंगी सामावला
शब्द कल्लोळ तेजाचे
वाटे वेद मुखे आला
माय-मराठी आपुली
धन्य धन्य तुवा केली
जन्म घेऊ वारंवार
तुम्हा शब्दांचीच भुली
धन्य संताजी मैतर
गाथा शब्द स्थिर केला
धन्य महाराष्ट्र भूमी
धन्य तुका देखियला
भावभक्तिमय गाथा
वाचू, थोडी आचरून
क्षण क्षण जीवनाचे
जरा घेऊ उजळून
(तुकारामबीजेच्या निमित्ताने - फाल्गुन वद्य द्वितीया)