और जाहले नाते आज बापलेकांचे!

मुसलसल गझल

और जाहले नाते आज बापलेकांचे!
पोरगे पहा पाढे वाचतात बापांचे!!

पोर बोलते भाषा कालचीच बापाची.....
बाप झेलतो आहे बाण त्याच शब्दांचे!

केवढा लळा होता काल याच बापाचा....
भेटणे किती दुर्मिळ आज बापलेकांचे!

पाहुण्यापरी येती पोरगे घरी आता.....
आजही घरी घुमती बोल बोबडे त्यांचे!

मूर्तिमंत बापाची पोर एक आवृत्ती!
सारखे किती आहे ते उधाण दोघांचे!!

झाड आजही आहे त्याच कालच्या जागी!
दूर पाखरे गेली, भास राहिले त्यांचे!!

वेगळे जरी घरटे आज बापलेकांचे!
एकसारखे स्पंदन आज एकमेकांचे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१