जे जे करावयाचे, ते ते करून झाले!

गझल
जे जे करावयाचे, ते ते करून झाले!
मरणा! खुशाल ये तू, माझे जगून झाले!!

उरलेच काय आता डोळ्यांस काम माझ्या?
नव्हते बघावयाचे तेही बघून झाले!

माझा म्हणून आता हा देह फक्त आहे....
जे काय कनवटीला होते....विकून झाले!

तो चेहरा पुसटसा स्मरतो जरा जरासा....
दिसलास जीवना! पण, दर्शन दुरून झाले!

मरणास काय दुनिये, मी घाबरेन आता?
व्हावा सराव इतक्या वेळा मरून झाले!

ना थांबलीच त्यांची केव्हा टवाळखोरी!
हझलेतुनी कितीदा मी भोसडून झाले!!

आशय मुळात होता गद्यात्म अन् दरिद्री.....
गझलेत कैक कावे त्यांचे करून झाले!

होती मुळात पोकळ गझलेमधील भाषा;
सगळे चतुर पवित्रे पण वापरून झाले!

काही करून नाही भिडलीच लय मनाला!
मिसरे कितीक वेळा ते गुणगुणून झाले!!

जात्या मुळीच नाही मी पुण्यवान कोणी!
हातून पुण्य झाले....तेही चुकून झाले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१