काव्य हृदयातून यावे लागते!

गझल
काव्य हृदयातून यावे लागते!
पण, तसे आधी जगावे लागते!!

स्वस्तही मिळतात वस्तू चांगल्या.....
मात्र त्याकरता फिरावे लागते!

शब्द दिमतीला हवे ते यायला;
तेवढे चिंतन करावे लागते!

पोचतो ध्येयाप्रती लवकर कुणी!
कैक लोकांना झुरावे लागते!!

सद्गुरू मिळतात.....पुण्याई हवी!
जन्मभरही वणवणावे लागते!!

कोण तू, हिमनग? नको तोरा तुझा....
हिमकड्याला कोसळावे लागते!

फाटते आभाळही केव्हा तरी....
या धरेला सावरावे लागते!

शायरी चरितार्थ केल्याने किती....
त्यास गोष्टींना मुकावे लागते!

शेरही चढतो कधी दारूपरी!
मात्र साकी त्यास व्हावे लागते!!

राहिली आहे किती गंगाजळी?
संपल्यावर श्वास, जावे लागते!

सूर्यही असशील तू गझलेतला!
पेटतो, त्याला विझावे लागते!!

  -------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१