दुष्काळ
ऐन थंडीमधी
उरात भडका
शिवार पोरका
भासतसे ॥
आटले पाझर
तळाठायी पाणी
मिळेना शेंदूनी
घडाभर ॥
हंडाभर जळ
मुखं खंडीभर
निव्वळ अधर
ओलवावे ॥
उरली ना काडी
दातही कोराया
जित्रापा खावया
काय द्यावे ? ॥
सोडली भाकडं
कित्येक ही मेली
दुभती विकली
कुणब्यांनी ॥
नाही काम-धाम
नाही आन-पाणी
गाशा गुंडाळूनी
जाते झाले ॥
कसा हा दुष्काळ
कुठे ना ओलीत
मात्र डोळीयात
महापूर ॥
- उद्धव कराड (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.