पंचमहाभूते

पंच महाभूते

धरा झेली सार्‍या भूता
ठेव अवघी सांभाळी
भार वाहते एकली
उभ्या जगाची माऊली

ठेव थेंब ओलाव्याची
अनमोल सार्‍या जीवा
फुले जीवनाचा मळा
जीव भेटतसे जीवा

ठेव दीप्तीमंत अति
रवी हृदय अंबरी
उब अंतरात जरी
जीव चळवळ करी

ठेव झुळुझुळु वाहे
वारे आसमंती जात
बांधताती हळुवार
पृथ्वी-आप जन्मगाठ

महाभूत ते थोरले
पैस दिसेना कळेना
राही व्यापून चारींना
काय दाखवाव्या खुणा

विरोधात ठाकताती
एकाचढ एक जाणा
कालवले असे तरी
यांचा निवाड लागेना

कळे एवढे बुद्धिला
परी "जीवन" कळेना
वादविवाद करता
अंत पार तो लागेना