अक्षय नाते ...
इथेच आहे कृष्ण अजुनही
राधासखीही इथेच रुळली
देहाची आसक्ती सुटता
मधुराभक्ति तरी गवसली
दिव्यप्रेम हे जीवाशिवाचे
अजून फुलते असे धरेवर
गाथेमधुनी कधी बरसते
ज्ञानेशाच्या ओवीतून झरझर
राजघराणे त्यागून मीरा
वाट चालते वृंदावनची
लोभावून हरि धावत मागे
जनाईसंगे शेण्या वेची
समर्पणाची मस्ती आगळी
'माझे-मीपण' काही नुरते
देवभक्त ते एकचि होता
कान्हा-राधा अक्षय नाते...