खरेच मी फारसा कुठे येत जात नाही!

गझल
खरेच मी फारसा कुठे येत जात नाही!
अलीकडे मैफिलीत मी फार गात नाही!!

कुठून आणू तमा तुला मी प्रकाश वेड्या?
असाच कंदील एक मी, ज्यात वात नाही!

जनावरेही बरी, अशी माणसे अघोरी.....
खरेच माणूसकी अता माणसात नाही!

असेलही सत्य तू मला सांगतोस ते, पण;
अजून माझ्या तरी तसे वाचनात नाही!

तमाम नकली खडेच मखरात बैसलेले....
खरा हिरा, तोच नेमका कोंदणात नाही!

सुने सुने घर उठे मला खायला, गिळाया!
मुलेच झाली विभक्त, घरपण घरात नाही!!

तुझ्यासवे मी उन्हात सुद्धा मजेत होतो!
तुझ्याविना मौज आज या चांदण्यात नाही!!

भले किती पावसावरी तो लिहील गझला....
अजून भिजला कधीच तो पावसात नाही!

कितीक वेळा करेल तडजोड तो तुझ्याशी?
खरेच आहे, करू नये जे मनात नाही!

अजूनही स्वप्न पाहतो चंद्रचांदण्याचे!
अजून मी पाहिली कधी चांदरात नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१